महाराष्ट्रातील वनसंपदा आणि जैवविविधता टिकवण्यासाठी वनविभागाची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, राज्यातील वनविभागात तब्बल २,४०८ पदे रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून समोर आले आहे. राज्यातील एकूण २३,४६९ मंजूर पदांपैकी एवढी मोठी संख्या रिक्त असल्याने विभागाच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.
रिक्त पदांमुळे वन्यजीव संवर्धनावर परिणाम
महाराष्ट्रात ताडोबा-अंधारी, बोर, पेंच, नवेगाव-नागझिरा, मेळघाट आणि सह्याद्री असे सहा व्याघ्रप्रकल्प आहेत. याशिवाय ४८ पेक्षा जास्त अभयारण्ये आहेत. या प्रकल्पांमध्ये, सामाजिक वनीकरण, प्रादेशिक विभाग, वन्यजीव विभाग, मूल्यांकन व शिक्षण अशा सर्वच उपविभागांत मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने संवर्धनाचे काम वेळेत आणि योग्य पद्धतीने पार पडण्यात अडचणी येत आहेत.
गटनिहाय रिक्तपदे
मिळालेल्या माहितीनुसार –
- गट ‘अ’ : सरळ सेवेची ९२ पदे मंजूर, त्यापैकी ४४ कार्यरत, तर ४८ रिक्त.
- मुख्य वनसंरक्षक पदोन्नतीतील १४ पदे रिक्त.
- सहाय्यक वनसंरक्षकांची ३० पदे अद्याप रिक्त.
- एकूण मंजूर ६०४ पदांपैकी १२८ पदे रिक्त.
- गट ‘ब’ : १,१०६ पदांपैकी २६४ पदे रिक्त.
- अराजपत्रित ‘ब’ गट : १४६ पदांपैकी ५९ रिक्त.
- गट ‘क’ : १६,५१७ पदांपैकी तब्बल १,७५८ पदे रिक्त.
- गट ‘ड’ : ९०१ पदांपैकी १९९ पदे रिक्त.
ही आकडेवारी स्पष्ट करते की, राज्यभरात मोठ्या प्रमाणात मानवबळ कमी आहे आणि यामुळे वनविभागाचे कामकाज प्रचंड दबावाखाली आहे.
नवीन भरती प्रक्रियेची अपेक्षा
तज्ज्ञांच्या मते, रिक्त पदे भरून काढल्याशिवाय वन्यजीव संवर्धन, वनीकरणाचे प्रकल्प, जंगलात होणाऱ्या अवैध कृत्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण होणार आहे. सरकारने तातडीने नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. वनसंरक्षणासाठी आवश्यक असलेले कर्मचारी वेळेत उपलब्ध झाले तर राज्यातील व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यांचे कामकाज अधिक प्रभावी होऊ शकते.
उमेदवारांसाठी संधी
ही भरती प्रक्रिया सुरु झाल्यास हजारो इच्छुक उमेदवारांना शासकीय नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही मोठी संधी असेल, कारण वनविभागातील नोकऱ्या केवळ स्थिर रोजगारच देत नाहीत तर निसर्गसंवर्धनाच्या कामात थेट सहभागाची संधी देखील देतात.
नोकरी इच्छुकांनी वनविभागाच्या अधिकृत वेबसाईटवर आणि महाभरतीच्या अधिकृत मोबाईल अॅपवर लक्ष ठेवावे, जेणेकरून भरती प्रक्रियेबाबत सर्वात आधी अपडेट मिळेल.